... म्हणून सोनू सूदसाठी मोगातील तो रस्ता झाला आणखीन खास

आई प्रोफेसर सरोज सूद असे झाले रस्त्याचे नामकरण

... म्हणून सोनू सूदसाठी मोगातील तो रस्ता झाला आणखीन खास


पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू सूद लॉकडाऊन काळात सामान्यांमध्ये विशेष लोकप्रिय झाला आहे. करोना काळात सामान्यांना सर्वाधिक मदत करणारा सेलिब्रिटी म्हणून सोनू सूदकडे पाहिलं जातं. त्यामुळे अभिनेता असण्यासोबतच त्याची एक वेगळी प्रतिमा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. गरजुंची मदत करणारा सोनू सूद कायम त्याच्या सत्कार्याविषयी बोलताना आईचा आवर्जुन उल्लेख करत असतो. विशेष म्हणजे आता एका रस्त्याला सोनू सूदच्या आईचं नाव देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.

सोनू सूदने अलिकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मोगातील एका रस्त्याला त्याच्या आईचं नाव देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. सोनू सूदचं लहानपण ज्या ठिकाणी गेलं. ज्या रस्त्यावर तो खेळला त्या रस्त्याला प्रोफेसर सरोज सूद असं नाव देण्यात आलं आहे. ‘हे माझ्या आयुष्यातील सर्वात खास ठिकाणांपैकी एक आहे’, असं म्हणत सोनू सूदने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

 

“या रस्त्याचे नाव प्रोफेसर सरोज सूद आहे. मी आयुष्यभर या रस्त्यावर चाललो, माझं घर त्या बाजूला आहे आणि मी याच रस्त्यावरुन नेहमी शाळेत जात होतो. केवळ मीच नाही, तर माझे वडील आणि आईसुद्धा याच रस्त्याने जात होते. माझ्या आयुष्यातील हा एक खास क्षण आहे. रात्रीचे अडीच वाजले आहेत आणि मी माझ्या घरी जातोय”, असं सोनू सूदने म्हटलं आहे.