श्रीं च्या आगमनाच्या मुहूर्तावर नाट्यगृहांची प्रतीक्षा संपावी

सिने-नाट्य कलाकार विजय गोखले यांचे गणपत्तीबाप्पाला साकडे

श्रीं च्या आगमनाच्या मुहूर्तावर नाट्यगृहांची प्रतीक्षा संपावी

करोनाच्या महामारीमुळे गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ सांस्कृतीक चळवळ खंडीत झाली आहे. कलाकारांपासून पडद्यामागील कलाकारांचे जगण्याचा संघर्ष सुरु असून श्रीं च्या आगमनाच्या मुहूर्तावर नाट्यगृहांची आणि ओघाने कलाकार व पडद्यामागील तंत्रज्ञ, कलाकार यांची देखील प्रतीक्षा संपावी असे सिने-नाट्य कलाकार विजय गोखले यांनी गणपत्ती बाप्पाच्या चरणी साकडे घातले. 

परिस्थिती बिकट असली तरी पडद्यामागील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी परिस्थितीशी दोन हात करणे थांबवलेले नाही. ह्या संघर्षातून बुद्धिची देवता श्री गणरायच मार्ग काढतील असा विश्वास बाळगत पडद्यामागील कलाकारांपैकी रणजीत सोनावळे यांनी श्रीं च्या मुर्तींचा स्टॉल लावला असून ज्येष्ठ सिने-नाटय कलाकार विजय गोखले यांच्या हस्ते आणि संवाद पुणे व अखिल भारतीय नाट्य परिषद कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनिल महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचे आैपचारीक उद्घघाटन करण्यात आले, त्यावेळी गोखले बोलत होते. यावेळी अशोक सोनावळे, रणजीत सोनावळे, काैस्तुभ सोनावळे, मनोरंजन संस्थचे मनोहर कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. 

गोखले पुढे म्हणाले, रंगमंचीय अविष्कार बंद असल्याने कलेचे उपासक बॅक स्टेज आर्टीस्ट यांनी जगायचे कसे हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. अशा वेळी स्वतःच्या उपजीवीकेसाठी बुद्धी चातुर्य वापरून आणि कोणत्याही स्तरावर जाऊन कष्ट उपसण्याची तयारी दाखवत हे कलाकार जगण्याचा संघर्ष करीत आहे. आपण त्यांच्या ह्या सकारात्मक प्रत्यनांना प्रतिसाद द्यायलाच हवा.