ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन

सुप्रसिद्ध अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन झालं. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी आपल्या विनोदी पात्रांनी गाजवलेल्या या अभिनेत्याला कोरोनाने ग्रासलं होतं. दोन आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर किशोर नांदलस्कर यांनी दु. २.३० च्या सुमारास ठाणे इथे अखेरचा श्वास घेतला.

किशोर नांदलस्कर हे पूर्वी मुंबईतील भोईवाडा-परळ इथे राहात होते. मुंबईतील घर छोटं असल्यामुळे ते मंदिरात झोपायचे. याबाबतचं वृत्त दैनिक सकाळमध्ये आल्यानंतर, तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांना घर मंजूर केलं होतं. त्यांना बोरिवलीत चांगलं घर मिळालं होतं.

किशोर नांदलस्कर यांचा जन्म मुंबईचाच. मुंबईत लॅमिंग्टन रस्ता, नागपाडा, घाटकोपर आणि अन्य काही भागात त्यांचे बालपणपण गेले. ‘न्यू इरा हायस्कूल’ आणि ‘युनियन हायस्कूल’ येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. किशोर नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला होता. त्या काळात त्यांनी नाटकांमधून स्त्री भूमिका केल्या होत्या. केशवराव दाते यांच्या नाटक कंपनीत तसेच अन्य काही नाटकांमधून देखील त्यांनी काम केले होते. पुढे अभिनयाला रामराम करून खंडेराव यांनी काही काळ ‘ज्युपीटर’ गिरणीत नोकरी केली. गिरणीत काम करत असतानाच ते आंतरगिरणी तसेच कामगार नाटय़स्पर्धेतही नाटके बसवायचे. त्या वातावरणातच नांदलस्कर लहानाचे मोठे झाले. त्यामुळे अभिनयाची आवड त्यांना बालपणापासूनच होती. 

नांदलस्कर यांनी सुमारे ४० नाटके, ३० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि तर, 20हून अधिक मालिकांमधून काम केले होते. महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांचा बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. ‘जिस देश में गंगा रहता है’ (गोविंदा), ‘तेरा मेरा साथ है’ (अजय देवगण), ‘खाकी’ (अमिताभ बच्चन) यांच्याबरोबर काम करायची संधी त्यांना मिळाली. ‘चाल जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांतही त्यांची भूमिका होती.